इतिहास
राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सूरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. यामुळे ऋषीमुनींनी विघ्नासूराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की, तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांनी घ्यावे व तुम्ही येथेचे वास्तव्य करावे. विघ्नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला.
१७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला.
विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे २० फूट लांब सभागृह असून आतील गाभारा १० बाय १० फूटाचा आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर हिरा व डोळ्यांमध्ये आणि नाभीवर माणिक आहेत.