आरती

श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टची भाविकांकरिता धार्मिक विधी व्यवस्था

देवाधिदेव श्रीविघ्नेश्वर गणेश म्हणजे कोट्यावधी भक्तांच्या मनात श्रध्दा व निष्ठेचे महामंदिर असलेले एकमेवाद्वितीय देवता. या देवतांमध्येही अष्टविनायकांचा महिमा मोठा आणि या अष्टविनायकांतील एक महत्वाचे देवस्थान म्हणजे साक्षात श्री विघ्नेश्वराचे श्रीक्षेत्र ओझर, श्रीविघ्नेश्वर गणेश नवसाला पावतो. याचा अनुभव अनेक भक्तजणांना आलेला आहे.

श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने भाविकांना अभिषेक, पुजा करणेसाठी स्वतंत्र कक्षाची सोय केली आहे. यामध्ये भाविकांच्या इच्छेनुसार अथर्वशिर्ष, महाअभिषेक, ब्रह्मणस्पती, पवमानसुक्त, पूर्णरुद्र, अभिषेकपात्र, वार्षिक सहस्त्रवर्तन, दूर्वा अभिषेक, महारुद्र व तहह्यात अभिषेक शांती समाधानाने करता येतात.
श्री विघ्नेश्वर गणेशाचा गणेशोत्सव हा भाविकांसाठी मोठा आनंदोत्सव असतो. हा उत्सव दरवर्षी भाद्रपद शुध्द प्रतिपदा ते पंचमी असा पाच दिवस चालतो. पहिल्या दिवशी श्रीं ची पालखी पूर्वद्वारी उंब्रज या गावाला जाते. तेथे लक्ष्मी-नारायणाचे पूजन होते. दुसऱ्या दिवशी दक्षिण द्वाराला म्हणजे धनगरवाडी येथे जाते. तेथे उमा-महेश्वराची पूजा होते. तृतियेला पालखी शिरोली खुर्द येथे पश्चिमद्वारी जाते. तेथे रति-मदनाची पूजा केली जाते. चवथ्या दिवशी पालखी उत्तरद्वारी आमराई येथे जाते तेथे सूर्य-पृथ्वी यांचे पूजन होते. शेवटी पंचमीला श्री विघ्नेश्वराच्या अवताराचे पूजन होवून या आनंदोत्सवाची सांगता करण्यात येते. हे पाच दिवस ओझर ग्रामवासियांसाठी मंतरलेले असतात. विशेष म्हणजे द्वारयात्रेत सर्व अबालवृध्द अनवाणी पायाने सहभागी होतात. या कालावधीमध्ये मोरया गोसावी यांच्या पदांचे गायन केले जाते. तसेच सनई चौघड्याचे अखंड वादन केले जाते. त्याचप्रमाणे दरवर्षी माघ शु. चतुर्थीला गणेश जयंती सोहळा साजरा करीत असताना अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. यामध्ये किर्तन, प्रवचनाचा असंख्य भाविक व ग्रामस्थ लाभ घेत असतात.